मेरा कुछ सामान ...


कुछ कम ही तआल्लुक हैं, मोहोब्बत का जुनून से..
दिवाने तो होते हैं, बनायें नहीं जातें..
सुदर्शन फकीर च्या या ओळी खूप खूप आठवल्या लैला मजनू बघताना. हा चित्रपट बघून जवळ जवळ दिड महिना उलटला आणि चित्रपट किती चालला याची मला फार कल्पना नाही. इम्तियाजचा स्पष्ट प्रभाव असलेली मांडणी, आजच्या काळात अतिशयोक्त वाटणार्या भावना आणि नविन अनोळखी चेहरे.. पण त्याचबरोबर काश्मिरचं अलौकिक सौंदर्य, जॉय बरुआ आणि निलाद्र कुमार यांचं स्वर्गीय संगीत,  इर्शाद कामिलचे गुलजारीश शब्द, अविनाश तिवारीचा खर्जातला आवाज आणि लाजवाब अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू होत्या. चित्रपट त्याच्या सगळ्या मर्यादांसह सुंदरच वाटला मला. खासकरुन मध्यंतरानंतरचा भाग. जिथे कैस मजनू बनत जातो आणि लैलाच्या व्यक्तिमत्त्वातली तिलाही ठाऊक नसलेली लैला साकार होऊ लागते. इतकं भीषण सुंदर, उत्कट काही घडत जातं नजरेसमोर तेव्हा त्याच्या मर्यादांचा विचार करणे आणि  त्याची कारणमिमांसा शोधण्याची उठाठेव करणे आपल्यालाच क्षुद्र बनवत असतं. हे असं घडताना थांबवू नये कोणी कोणाला.. रोखू नये त्या मरणाच्या वाटेवर जाण्यापासून.... जळू द्यावं स्वतःच्याच अग्नीत आणि उडू द्यावी वार्यावर राख पुन्हा पुन्हा असे मजनू बनण्यासाठी..

म्हणूनच या ओळी चित्रपट पाहिल्यापासून माझी पाठ सोडत नाहियेत. पुन्हा, पुनःपुन्हा आणि पुन्हा लैला मजनू ची गाणी ऐकताना या ओळी कायम कुठेतरी बॅकग्राऊंडला आहेत असं वाटतंय.
खूप वर्षांनी रहमान-गुलझार जोडीचा नसलेला किंवा त्यांच्यापैकी कोणीच नसलेला आणि सगळाच्या सगळा आवडलेला अल्बम आलाय. आणि गेले काही आठवडे तो रिपीट मोड वर ऐकतेय मी..

लैला तर लैलाच आहे. कोणीही सामान्य मुलगी असावी तितकी सामान्य.. तिच्यातल्या लैलापासून अनभिज्ञ.. पण कोणी कैस तिच्यासाठी मजनू व्हावा अशी. ज्याच्यामुळे तिच्यातली लैला जागी व्हावी अशी. लैला तशी खास नाहीच.. पण लैलाला बघायला जी मजनूची नजर लागते ती कैस सोडून कोणाकडेच नाहीये. त्या नजरेनेच लैलाची आठवण बनवलीये कैसच्या मनात आणि मग तो म्हणतो, 

मैंने बात ये तुमसे कहनी हैं.. तेरा प्यार खुशी की टहनी हैं....
मैं श्याम-सहर अब हंसता हुं.. मैंने याद तुम्हारी पहनी हैं...

त्याला लैला हवीये पण ती नाहीये असं नाहीच. ती आहेच. तिची आठवण ओढून घेतलिये त्याने मनभर. मग कसला दुरावा?
तो म्हणतो,

मेरे गुनाहोंमें, मेरे सवाबोंमे..
शामिल तू...
भूली अठ्ठनीसी, बचपन के कुर्तेमेंसे,
मिल तू..

या आणि अशा अनेक गुलजारीश कल्पनांनी भरलेली आहेत यातली गाणी.
आणि त्यात आतिफचा आवाज..!
" मेरी लैला.. लैला.. ख्वाब तू हैं पहला.." या ओळीतल्या लैला म्हणण्यातली त्याची आर्तता आणि पं. भीमसेन जोशींची 'विठ्ठला.. मायबापा' म्हणण्यातली आर्तता यात मला तरी कुठे फरक वाटत नाही. आणि या आर्ततेने लैलाला स्वतःतल्या लैलाच्या त्या रुपाचा शोध लागतो. ज्यासाठी मरण आणि मरणाचं भय हा भागच कुठे उरला नाहीये

"ना यहाँ दिखावा है.. ना यहाँ दुनियावी जजबात है...
जीत ली हैं आखिर में हम दोनोंने ये बाझीया.."
मरणानंतर असं म्हणण्याची रुहानी अवस्था त्यांच्या अनुभवायला येते. मरण त्यांच्या एकत्र येण्याचा सोहळा बनून जातो.
"सुबह सुबह ये बात हो..
नजर मिले जरा.. जरा रात हो.."
असं वाटणारं गुलजारीश कल्पनांचं आयुष्य त्यांना लाभतं.. 

तोवर मात्र चालू असतं लैलाचं आयुष्य.. मजनूशी अनभिज्ञ.. पण मजनूला मजनू झालेलं पाहून उजळून जातं.. जसं राधेच्या प्रेमाने कृष्ण उजळून गेला होता. राधा राधा राहिलीच नाही. ती कृष्ण बनून गेली. हा कृष्णाच्या उजळून जाण्याचा क्षण होता.  तशीच लैलापण... आणि मग लैलाला तिचा मार्ग समजला, जेव्हा मजनू तिला म्हणाला..
"मैं असल में तू हूं.. तेरे नकल नही..."

"शोर हुवा.. घनघोर हुवा... फिर गौर हुवा...
हर दर्द मिटा.. हर फर्क मिटा.. मैं और हुवा..
कोई बात नई.. करामात नई.. कायनात नई..
आग लगी, कुछ खाक हुवा.. कुछ पाक हुवा.."
असं म्हणणार्या मजनूला, असं म्हणन्यात जो जुनून आहे त्याला, तीच व्यक्ती समजून घेऊ शकेल जिने आपल्या आतली धग ज्वालामुखी बनण्यातली वेदना आणि नंतरची शांतता अनुभवलिये.. आपल्यातल्या मजनूला आपल्यापेक्षा वरचढ होताना अनुभवलंय..

जेव्हा कोरस म्हणतो "तेरा खत्म हुआ अक्ल का सफर..' तेव्हा " इश्क बडा नाजूक मिजाज होता हैं.. अक्ल का बोज ऊठा नही पाता" या ओळींची आठवण झाल्यावाचून राहत नाही.
बरोबर ओळी आहेत..
सरफिरीसी बात हैं मेरी.. आयेगी ना ये समझ तेरी..

मजनूला मजनू बनायला लैलाची गरज नाहीये.. लैला अगदी निमित्तमात्र. पण कदाचित पहाडोंके परे जायचं त्याचं स्वप्न त्याला वेडा समजता ऐकून घेणारी कदाचित ती पहिली आणि एकमेव असेल. कदाचित ते स्वप्न बोलू शकावं  ज्याच्यासमोर अस त्याला कोणे भेटलं नसावं..कदाचित तो बोलू शकला नसावा. काय असते वेळ? काळ? एक क्षण पुरतो आणि तो आला की मग आयुष्यभर सरत नाही.
मजनूचा तो क्षण कधी सरलाच नाही. लैलासोबत असण्याचा क्षण. इतरांना कळू शकता लैला कायम सोबत होती त्याच्या.  कायम.. प्रत्येक क्षणात..प्रत्येक कणात.. फुलांत.. पानांत.. त्याच्यात.. तो वेगळा उरलाच नाही लैलापासून..

जॉय बरुआ, निलाद्री कुमार, मोहीत-अरिजीत-आतिफ आणि ईर्शाद कामिल.. गाण्यातलं काव्य.. कवितेतलं गाणं.. संगीतातली उत्कटता.. आणि वेडेपणातलं सौंदर्य.. यातलं पहिल्यांदा काय सुचलं आणि नंतर त्यात काय गुंफलं हे शोधणं अशक्य व्हावं इतक्या या गोष्टी तद्रूप पावल्या आहेत.
किती किती सुंदर जागा आहेत..
"दिल सवालोसेही ना दे रुला " म्हणणारी एखादी ओळ..  " मेरी लैला.." म्हणण्यातली आर्तता.. "तुम नजर में रहो.."गाण्याच्या सुरुआतीला वा़जवलेला तुकडा.. 'आंखे बोले, हो लबपे खामोशी' मधल्या खामोशीचा खर्ज.. नंतर ड्रम वर वाजवलेला पहाडी ठेका.. "हाफिज हाफिज " मधला मॅडनेस.. गयी कामसे मधली म्युझिकल ची आठवण करुन देणारी धून..

या अल्बम ने बर्याच गोष्टी झाल्या. एखाद्या अल्बम ने झपाटून जाणं किती मस्त असतं हे विसरलेच होते मी काही काळात.. तो वेडेपणा या अल्बमच्या निमित्ताने परत आला. एक छान अल्बम आता प्लेलिस्ट मध्ये ॅड झाला.. त्या निमित्ताने परत एकदा खूप काळाने काही लिहावसं वाटलं.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आतली लैला आणि मजनू दोघेही आपल्यापेक्षा वरचढ होत नाहीत याबद्दल विषण्ण हायसं वाटलं...
मेरा कुछ सामान ...
दुरूनही चाललो असतो सोबत,
फुलली असती आपली बाग..
तुझ्या पाठी माझा वेडेपणा,
माझ्या पाठीवर तुझा राग...

जमलं नाही समजून घेणं,
तुला थोडं, मला थोडं..
मधल्या मधे भांबावलेलं,
तुझं माझं नातं वेडं....

बरोबर आहे तुझं म्हणणं,
प्रेम बीम खोटंय सगळं..
तुझं माझं एकच दुःख,
पण तुझं वेगळं, माझं वेगळं.....
मेरा कुछ सामान ...
Created a facebook page. Like, subscribe and spread the word for regular updates.

मेरा कुछ सामान...


Stay tunned.. :-) 
मेरा कुछ सामान ...
तुला न पडलेली माझी स्वप्नं खुडून टाकताना,
कानात घुमत राहते तू न मारलेली हाक..
आणि तू मला न लिहिलेली पत्र फाडून टाकताना,
डोक्यात रुंजी घालते तुला न आलेली आठवण..
बंद पापण्यांआड उतू चाललेली तुझी स्वप्नं,
आणि शिवलेल्या ओठांमागे अडवून धरलेली साद घेऊन मी चालतेय,
तुझी सोबत न मिळालेल्या या वाटेवरुन..
पण तरीही मनात जपून ठेवेन मी कायम,
तू न केलेलं प्रेम..
मेरा कुछ सामान ...
काही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत..
पैशाने विकत घेता येत नाहीत,
जबरदस्तीने आपल्याशा करता येत नाहीत,
वाट पाहिली म्हणून नशिबी येत नाहीत,
मागून मिळत नाहीत..
तरीही मागितलं...
स्वतःच्या स्वभावाला मुरड घालून,
निर्लज्ज ठरण्याची जोखिम पत्करत,
साद घातली तुला!
तुझं लक्ष माझ्याकडे जावं म्हणून...!
जग जिंकण्याच्या व्यापात गुंतलेला तू...
कळवळून तुला मारलेल्या हाकेनंतर तुझी नजर वळली खरी,
पण गलिव्हरने पहावं बुटक्यांच्या समूहाकडे, तशी..
त्यात उमटली नाही साधी दखलपण माझ्या आकांताची!
आणि क्षणार्धात पुन्हा बुडून गेलास आपल्या व्यापात..
आता शब्द कायमचे मुके,
हाक कायमची कोंडलेली...
काही गोष्टी मिळत नाहीत!
त्या मिळत नाहीत हेच एकमेव सत्य असतं त्यांचं..
अशावेळी निघून जावं,
वेळ नसलेल्या प्रदेशात
न संपणारी प्रतिक्षा घेऊन
न सरणार्या आयुष्यासोबत...
मेरा कुछ सामान ...
कृष्ण होण्याची ओढ असणं सहाजिक आहे, स्वाभाविक आहे. कारण ते पूर्णत्व आहे. विलोभनीय, आकर्षक, मोहवणारं, प्रत्येकाला आपलसं वाटून कधीच कोणाचं नसणारं पूर्णत्व! कृष्ण होण्याचा प्रवासही नैसर्गिक प्रवास आहे. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे. एक एक पाऊल रोज स्वतःला घडवत, संघर्ष करत त्या वाटेवर चालत रहाणं.. हे सगळं प्रवाहाच्या दिशेनेच जाणं आहे.
अनय होणं अवघड आहे. कारण अनय होण्याची वाट कोणी आपणहून निवडत नाही. अनय होण्याची ओढ वाटणं नैसर्गिक नाही. त्याच्या दु:खाचं आकर्षण वाटेल कदाचित पण अनय होण्याचा प्रवास कोणी स्वतःहून निवडणं अशक्यच! आणि लादल्या गेलेल्या गोष्टीइतका त्याचा संघर्षही त्रासदायकच. रोज उठून स्वतःमध्ये ती शक्ती, ते धैर्य निर्माण करणं - समोरच्याच्या डोळ्यात दुसर्‍याच कोणाचंतरी विश्व पहायची.. ज्याचं विश्व आपल्या डोळ्यांत आहे.. ज्याच्या स्वप्नांनी आपले डोळे भरुन गेलेत. हे तो करु शकला म्हणून अनय चं कौतुक. त्याने रोज अंत पाहणार्‍या गोष्टीला सामोरं जाण्याची शक्ती रोज विनातक्रार निर्माण केली म्हणून. पण तो पुरुष होता हे ही त्याच्या कौतुकाचं कारण आहे. बाई करत राहिलीच असती तिच्या नवर्‍यावर प्रेम, त्याच्या डोळ्यात तिच्या स्वप्नांना जागा नसती तरी. रोज मरायची शक्ती गोळा करुनच रोज स्वतःला जन्माला घालणं अपेक्षितच असतं बायकांकडून. अनय चं अनय होणं म्हणूनच वेगळं. कारण ते अनपेक्षितच होतं.
सगळ्यांनाच आपलंसं वाटून शेवटी त्याचं कोणाचंच नसणं राधेला उशीरा का होईना समजलं असावं. पण तोवर तरी तिला मिळालेले आयुष्य उधळून टाकावेत असे त्याच्यासोबतचे क्षण. आपल्या डोळ्यांत जसं त्याचं विश्व आहे तसंच त्याच्याही डोळ्यांत आपलंच विश्व आहे असं वाटण्याचे भाबडे क्षण. तेवढ्या संचितावर काढता येत असावं आयुष्य बहुधा. पण अनयाच्या वाट्याला तर ते खोटे भाबडे क्षण पण नव्हते, तरी त्याच्या नजरेत कायम तीच राहिली. तिचंच विश्व. तिचीच स्वप्न. 'ती'च बनून राहिला तो तिच्या अस्तित्वाभोवती. तिच्या अस्तित्वात कोणतीही भेसळ करण्याचा प्रयत्न न करता तिला ती राहू दिलं आणि स्वतः बनून गेला तिच्या रंगाचा. जसं प्रेम तिने केलेलं कृष्णावर तसंच अनय ने राधेवर आणि मग राधेला जितका कृष्ण मिळाला तितकीही ती त्याला न मिळाल्याने तिच्याहीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन अनय झाला तो.
अनयच्या दु:खाचं आकर्षण वाटणारा तू एकटा नाहीस. पण तू कधीच अनय होऊ शकणार नाहीस. होणारच नाहीस. कारण राधा बनता येण्याची पूर्वअट आहे त्यासाठी. तू अनय होऊ शकत नाहीस कारण तुला कृष्ण मिळाला तरी तू कधीच राधा होऊ शकत नाहीस.
मेरा कुछ सामान ...
तलम, आकर्षक पण टिकाऊ शब्दांचं
मजबूत जाळं विणून
आयुष्याच्या समुद्रात भिरकावलं
माझ्यातल्या विचारवंत कोळ्यानं,
दुःख पकडण्यासाठी...
पण अडकावं कसं माझं शब्दातीत दुःख
शब्दांच्या जाळ्यात?
शब्दांच्या चिमटीतून सतत निसटत
विश्वरुप साकारत गेलंय हे दुःख..
समजलंच नाही माझ्यातल्या विचारवंत कोळ्याला..
हा समुद्रच दुःखाचा आहे..
मेरा कुछ सामान ...
चूड पेटवली आणि धडाडून उठल्या ज्वाळा
बघता बघता वेढून टाकतील मला असं वाटलं..
माझाच घास घेवू बघण्याइतक्या उन्मत्त..
चोहीबाजूंनी..
अक्राळविक्राळ ज्वाळा...
त्याचा असह्य विरह एकदमच अंगावर आल्यासारख्या..
त्याच्यापर्यंत कधीच पोहचू न शकणारी माझी तळमळ
बाहेर आल्यासारख्या..
त्याच्या आत्ममग्न अनभिज्ञतेला माझ्या प्रेमाची दखल घ्यायला लावण्याच्या अट्टहासासारख्या..
आता व्यर्थ आहे या ज्वाळांच्या तडाख्यातून स्वतःला वाचवणं..
पण ही आग पुरती भस्मही करुन टाकत नाहीये मला..
बचावतेच आहे मी..
असह्य वेदनेत तळमळण्यासाठी..
रोज कणाकणाने मरण्यासाठी...
अजून आहेच बाकी माझं जळणं...
डेनेरस,
दरवेळी आगीतून वाचत राहणं बरं नाही बयो..
सारखी सारखी आपल्या स्वप्नांची अशी राख होत असताना आपणच फक्त मागं उरणं जीवघेणं असतं..
त्यापेक्षा जळून जावं आपल्या स्वप्नांबरोबर आपण..
स्वप्नांची वाट पहाणार्या पापण्या अश्रूंनी जेवढ्या जळतात तेवढ्या आगीने नाही...
मला विचार..
कालच रात्री त्याची सगळी स्वप्नं गोळा करुन
पेटवून आलेय मी मनाच्या स्मशानात...
चूड पेटवली आणि धडाडून उठल्या ज्वाळा...
मेरा कुछ सामान ...
पाऊस पाऊस
चिंब ओला
तुझ्या नजरेत
माझा झुला

पाऊस पाऊस
लपले पान
तुझ्या नजरेत
हिरवे रान

पाऊस पाऊस
गच्च भिज
तुझ्या नजरेत
वेडी वीज

पाऊस पाऊस
पुसले काजळ
तुझ्या नजरेत
भलते वादळ
!!!!!!!
मेरा कुछ सामान ...
तुझ्या घरात पाऊल टाकतानाच माहिती होतं,
हा काही आपला कायमचा मुक्काम नव्हे..
पण माझ्या विदग्ध आत्म्याला विसावा देऊ शकणारी,
हीच ती जागा...
आणि मग एकेक दिवस करत मुक्काम वाढतच गेला,
तुझं घर आपलंच समजू लागले मी..
कधी निघून जावं म्हटलं तर तू ही थांबवलस मला..
आणि मलाही नाही ओलांडता आला तुझा लोभसवाणा आपलेपणा..
मग सजवत गेले तुझं घर, आपलंच समजून..
कानेकोपरे धुंडाळले.. भूतकाळ चाचपला..
नवे रंग आणले, नवे गंध आणले, नवे सूर आणले..
बोलक्या झाल्या भिंती, हळुवार झाली हवा..
इतकंच काय पण,
तुझ्या अंगणभर मोगरासुद्धा बहरला,
आपल्या निरंतर गप्पांसोबत...
पण आता तुझ्या आपलेपणावर हक्क सांगू येतायेत माझी दुःखं..
तुझ्या घराच्या अवकाशात जमू लागलंय माझ्या अपेक्षांचं मळभ..
वेदनांनाही हवी झालीये तुझ्या घरात त्यांची जागा..
संकेत मिळालाय.. आता निघायला हवं..
माझ्यातल्या अनावर वादळाने आपलं अंगण उद्ध्वस्त होण्यापूर्वी..
तुझ्या चंद्रमौळी घरात माझ्या वेदनेचे सूर घुमण्यापूर्वी..
तुझ्या ओल्या आवाजात नको घालू शपथ आपल्या मोगर्याची..
आता माझी निघायची वेळ झाली...
मेरा कुछ सामान ...
अ‍ॅनिमेशन चित्रपट म्हणजे फक्त लहान मुलांसाठी असलेला प्रकार हा आपल्याकडचा एक सर्वसाधारण समज आहे. पण परदेशातले अ‍ॅनिमेशन चित्रपट, त्यांतील विषयांचं वैविध्यं आणि प्रगल्भता बघता कोणत्याही प्रौढाला खिळवून ठेऊ शकतील असेच हे चित्रपट आहेत. त्यातही खास उल्लेखनीय म्हणजे अमेरीकन आणि जपानी चित्रपट. आणि अजूनच स्पेसिफिकली बोलायचं झालं तर जपानमध्ये अबालवृद्धांसाठी म्हणून जे काही अ‍ॅनिमेशन चित्रपट बनवले जातात त्यासाठी अ‍ॅनिमे (anime) ही संज्ञा वापरली जाते. या विभागात केवळ प्रौढांसाठीच असलेल्या अतिशय किचकट, गुंतागुंतीच्या विषयापासून लहान मुलांसाठी असलेल्या हलक्याफुलक्या विषयापर्यंत सगळ्याचा समावेश होतो. त्यामानाने अमेरीकन अ‍ॅनिमेशन अजून तरी 'फक्त प्रौढांसाठी' या विभागात तशी मोजकीच आहेत.
अर्थातच यात डिस्नेचा सिंहाचा वाटा नाकारण्याचा प्रश्नच नाही. पण तो मान्य करुनही पिक्सरने बनवलेली अ‍ॅनिमेशन जास्त गोड, गोंडस, लोभसवाणी वाटतात हे मान्य करायलाच हवं. २००६ मध्ये डिस्नेने पिक्सर विकत घेतली खरी तरीही पिक्सर च्या नावाखाली बनणार्‍या चित्रपटांचं वलय काही कमी झालं नाही. या बॅनरखाली बनणारे चित्रपट आणि त्यातील पात्रं मनात घर करुन जातात हे नक्की. मग तो 'टॉय स्टोरी' मधला 'वूडी' असो की 'मॉन्स्टर्स' मधला 'सुली'. 'फायंडिंग निमो' मधला 'मार्लिन' असो की 'अप' मधला 'रसेल'.
फक्त एखाद्या ठराविक साच्यामधल्या नीतीकथा किंवा सुष्ट-दुष्ट संघर्ष दाखवण्यापलीकडे या चित्रपटांमध्ये बरंच काही दाखवलं गेलंय. माणसांचे राग, लोभ, प्रेम, माया, स्वार्थ, भीती, दुष्टपणा.. सगळंच... आणि फक्त इतक्यावरच न थांबता माणसाच्या अशा वर्तणूकीला त्याची परिस्थिती जबाबदार असते, असू शकते आणि प्रेमाचा, सहकार्याचा हात मिळाला तर माणूस कोणतीही, कितीही त्रासदायक परिस्थिती बदलू शकतो या सगळ्या गोष्टी कोणताही उपदेशाचा आव न आणता अतिशय मनोरंजक रीतीने आपल्यासमोर उलगडत जातात. आणि हे मनुष्यीकरण (humanization) ते कोणत्याही, अगदी कोणत्याही वस्तूला लागू करु शकतात. आणि ते ही इतक्या चपखल की आपण प्रेमातच पडावं त्यांच्या. 'कार्स' मधल्या गाड्या, 'वॉल-इ' मधले रोबोटस्, 'टॉय स्टोरी' मधली खेळणी, 'रॅटाटूई' मधला उंदिर या सगळ्या मनुष्येतर गोष्टींचं इतकं छान चित्रण केलंय की ही पात्रं माणसांइतकीच आपल्या जवळची होऊन जातात. रडत, धडपडत, थोडं घाबरत चाचरत आपल्या आतल्या भीतीवर मात करत नवा रस्ता शोधणारे हे सगळे जण मग आपलंच रुप वाटायला लागतात.
चित्रपटाचं किंवा कोणत्याही कलाकृतीचं यश यातच सामावलेलं असतं की किती लोकं तिच्याशी नाळ जोडू शकतात, रिलेट करु शकतात. त्यामुळेच प्रत्येक काळाच्या मानसिकतेनुसार त्या त्या काळाचे नायक-नायिकांचे साचे बदलत गेलेले आपल्याला पहायला मिळतात. पण हे निर्जिव किंवा मनुष्येतर प्राण्यांच्या संदर्भात करणं किती जोखमीचं काम असेल याची कल्पना ते काम करणार्‍यांनाच असावी. आणि असं जोखमीचं काम असूनही पिक्सर त्यात दर वेळी उत्तमरित्या यशस्वी होत आलेत हे नक्की..
जपानी अ‍ॅनिमे मात्र जरा गंभीर मामला आहे. त्यात हलकेफुलके चित्रपट नाहीतच असं नाही पण त्यातल्या गंभीर विषयांचं प्रमाण आणि प्रत बघता त्यांचा उल्लेख अत्यावश्यक आहे. पहिल्यांदा असा गंभीर चित्रपट पाहिला तेव्हा अ‍ॅनिमे ही काय भानगड असते हे मला माहिती नव्हतं. आणि चित्रपट होता, 'ग्रेव्ह ऑफ फायरफ्लाईज'. चित्रपटाची कथा दुसर्‍या महायुद्धात होरपळलेल्या एका बहिण-भावाभोवती फिरते. हल्लीच माझ्या वाचनात आलं की ही अकियुकी नोसाका यांच्या खर्‍या आयुष्यातली घटना आहे. हा चित्रपट पाहिला तेव्हा रडू आवरेचना. अर्थात चित्रपट फार सुंदर आहे आणि माणसाचं माणसाशी वेदनेच्या पातळीवर असं जोडलं जाणंही तितकच खरं. पण चित्रपट झाल्यावर, रडून झाल्यावर विचार आला की काय म्हणून लहान मुलांनी असे चित्रपट पहावेत? आणि मग त्यावेळी मला भावाकडून कळालं की हा लहान मुलांसाठीचा चित्रपट नाहीये. अ‍ॅनिमे वगैरे वेगळा प्रकार असतो. मग मात्र वेड्यासारखी या चित्रपटांच्या पाठी लागले मी. किती किती विषय आणि किती भावगर्भ चित्रपट. आणि काही तर इतके गुंतागुंतीची की त्यावर बेतलेल्या चित्रपटांनी हॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली. उदाहरणच द्यायचं झालं तर 'घोस्ट इन द शेल' वर बेतलेला 'मॅट्रिक्स' किंवा 'पॅपरिका' वरुन नोलान ला सुचलेला 'इनसेप्शन'. या चित्रपटांच्या विषय वैविध्यामुळे आणि गुंतागुंतीमुळे जसं थक्का व्हायला होतं तसंच त्यात जाणवणार्‍या तीव्र जपानी संस्कृती आणि तत्वज्ञानाच्या दर्शनानेदेखिल.बर्‍याचदा विदेशी चित्रपट म्हटले की त्यात अमेरिकन आणि युरोपियन चित्रपटांचाच भरणा असतो. अर्थात त्यांचं श्रेय तेवढं आहेच या उद्योगाला पण ते सगळे चित्रपट थोड्या फार फरकाने एकाच मातीतले, एकच संस्कृतीचे वाटतात. आणि मग त्या पार्श्वभूमीवर इराणी किंवा जपानी चित्रपट नजरेला, मनाला आणि बुद्धीलाही सुखावणारे, वेगळं काहीतरी बघितल्याचं समाधान देणारे वाटतात. पाश्चिमात्यांच्या तोडीस तोड तांत्रिक प्रगती पण त्याच वेळी जपानी लोकांनी त्यांच्या संस्कृतीची मर्मस्थानं ज्या कसोशीने जपली आहेत किंवा त्यात काळानुरुप बदल केले आहेत ते बघून कौतुक वाटायला लागतं. Spirited away, Howl’s moving castle, Secret world of arrietty, princess mononake.. स्वप्नकथेपासून अगदी ग्लोबलायझेशन, क्लायमेट चेंजपर्यंत कोणत्याही विषयावर आणि साध्या कौटुंबिक, आत्मचरीत्रात्मक ते sci-fi पर्यंत सगळ्या प्रकारात जपानी अ‍ॅनिमेशनने बाजी मारली आहे. पण हे असं ग्लोबल आणि प्रगत होत असतानाही चित्रपटभर तीव्रतेने जाणवणारा जपान फॅक्टर अनुभवायला भारी वाटतो. जणू काही दोन तास दुसर्‍या जगाची सफर करुन आलो आपण.
असाच काहीसा अनुभव 'पर्सेपॉलिस' आणि 'वॉल्ट्ज विथ बशीर' बघताना आला. 'पर्सेपॉलिस' हा चित्रपट त्याच नावाच्या आत्मचरीत्रात्मक चित्र-पुस्तकावर (कॉमिक बुक) बेतलेला आहे. ज्यात लेखिकेने इराणमधल्या इस्लामिक क्रांतीच्या आधीच्या आणि नंतरच्या आयुष्याचं चित्रण केलं आहे. तसंच 'वॉल्ट्ज विथ बशीर' या इस्त्रायली चित्रपटामध्ये अंशतः स्मृती हरवलेला एक सैनिक लेबॅनॉन युद्धातल्या त्याच्या भूतकाळाचा शोध घेताना दाखवलाय. हाही चित्रपट खर्‍या घटनांवर बेतलेला आहे. पण हे असे चित्रपट विरळाच. मक्तेदारी म्हणावी अशी अमेरीकन आणि जपानी चित्रपटांचीच.
हे सगळं आठवण्याचं कारण? उगाच विचार करताना वाटलं बिम्मच थोडा मोठा होऊन रसेल बनतो आणि तोच पुढे जाऊन लंपन होतो. (जी.ए.कुलकर्णींच्या धीरगंभीर आणि गूढ व्यक्तिमत्वाशी विसंगत असे लहान मुलांसाठी 'बखर बिम्म ची' नावाचे एक भन्नाट पुस्तक त्यांनी लिहिलय. सर्वांनी अगदी आवर्जून वाचावं असंच पुस्तक आहे ते.) आणि मग विचार आला की आपल्याकडे को बिम्म आणि लंपनच्या रुपाने आनंदाचा खजिना आहे तो कधी असा अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून जगासमोर येणार?
वास्तविक या सर्व चित्रपटांवर स्वतंत्र लेख होतील इतके भारी चित्रपट आहेत हे, पण त्यावर नंतर कधीतरी.. सवडीने. तूर्तास मात्र बिम्म आणि लंपनच्या संदर्भात पडलेले अनुत्तरीत प्रश्न घेऊनच थांबते.
मेरा कुछ सामान ...
जग चालतंच असतं
मागील पानावरुन पुढे...
चांदणीला फुलपाखरं पहिल्यांदा दिसतात तेव्हा...
पण चांदणीचं मात्र विश्व बदलून जातं..
हसत राहते लुकलुकत,
फुलपाखरं पाहता पाहता...
कोवळ्या फुलांत भिरभिरणारी फुलपाखरं..
निश्राप मनस्वीपणे लळा लावणारी फुलपाखरं...
नियती ठाऊक असतेच चांदणीला,
अगदी पहिल्यापासून...
अन् म्हणूनच फुलपाखरांचं तिला अप्रूपही जास्त..
फुलांनाही नसेल एवढं...
चांदणी निरखत राहते फुलपाखरांना कौतुकाने..
तो असह्य पण अटळ क्षण येईपर्यंत..
जग चालत राहतं..
काळाच्या ओघात फुलं प्रौढ बनतात... पोक्त नजरेसारखी..
आणि फुलपाखरं उडून जातात.. नजरेतल्या सुगंधासारखी...
फुलपाखरं उडून जातात तेव्हाही,
जग चालत राहतं..
मागील पानावरुन पुढे..
फुलंही गुंतून जातात त्यांच्या पोक्त व्यवहारात..
ती चांदणी मात्र विझून जाते गर्द काळोखात,
कायमची...
फुलपाखरं उडून जातात तेव्हा...